Friday, May 28, 2021

भेट

आपली जेंव्हा केंव्हा भेट होते
न कळे मी असा का वागतो
तुझे लक्ष दुसरीकडे गुंतवून
मी तुझ्याचकडे पहात असतो

घड्याळ

नविन घड्याळ भिंतीवर आले
मात्र वेळ चांगली यायची आहे
सखे सोबती निघून गेले पुढे
मी मात्र अजून तिथेच आहे

Thursday, May 27, 2021

आशा

आयुष्य जगताना जाणवले
प्रारब्ध काही चुकत नसते
आणि हे ही दिवस जातील
ह्या आशेवर पुढे जायचे असते

Wednesday, May 26, 2021

आयुष्यवाट

 भल्याबुर्या अनुभवांनी भरलेली ही आयुष्यवाट
 आपल्यापरीने चालताना सहज मागे पाहिले 
 जे माझ्यासोबत होते ते असणारच होते
 जे नव्हते ते कधीच माझे होणारे नव्हते

फितूर

केलास तू माझ्या प्रेमाचा स्वीकार 
हे तू न सांगताच मला समजले 
जेंव्हा तुझे हे फितूर दोन डोळे
अधीर ओठांआधी व्यक्त झाले

पैठणी

माझ्या आजीची जुनी खास पैठणी
अजूनही तशीच अगदी नवी दिसते 
परंपरागत संस्कारांचे प्रतिक हे वस्त्र
तिला जपणार्यांचे खूप कौतुक वाटते

Tuesday, May 25, 2021

गारवा

मनसोक्त बरसल्या पाऊस सरी 
आसमंती पसरला मस्त गारवा

या गारव्यातली ओली वाट चालताना
तुझा नाजूक हात अलगद हाती आला

चालताना अचानक तू बिलगलीस मला
अन् मी धन्यवाद म्हंटले या गारव्याला

वाटेच्या कोपर्याला होती एक चहा टपरी
कान्दा भजी,पकोड्यांची तयारी होती पुरी 

भिजलेले आपण दोघे एकाच छत्रीच्या आत
गरम भज्यांना वाफाळलेल्या चहाची साथ

आपल्या कोवळ्या प्रेमाचे हे क्षण धुंद ओले
या गारव्याने माझ्या मनी कायमचे घर केले

Sunday, May 23, 2021

वास

प्रत्येक वासाची स्वत:ची अशी आठवण असते
रायवळ आंबा,ताजा पेरू यादी मोठी होत जाते
असा एखादा वास खुणावतो अन मन अधीर होते
कोकणातल्या आजोळची वाडी स्पष्ट दिसते

Thursday, May 20, 2021

दोष

स्वतःबरोबर चांगलं काही होत नाही
म्हणून कोणावर रागवायची इच्छा नाही
आपल्याच चुका एवढ्या दिसतायेत
दुसऱ्याला दोष देण्यात काही अर्थ नाही

मुखपट्टी

मुखपट्टीची आता एवढी सवय झालीय
कि ती जर नसेल तर श्वास अधुरा होतोय
जिवलगांना भेटून किती काळ लोटला
हे आठवण्यातच सध्या दिवस जातोय

Wednesday, May 19, 2021

काळिज

प्रेम,आपुलकी या भावना अलवार असतात
पण म्हणून त्या नुसत्या असून उपयोग नसतो
खरंच जर या भावना समजून घ्यायच्या असतील
तर एखाद्याच्या काळजाला हात घालावा लागतो

मोरपीस

धुंद आठवणींनी भरलेली
सापडली एक जुनी वही
तिला उघडून बघायची
हिंमत अजून होत नाही
एखाद्या पानाआड थांबलेले
नाजुक मोरपीस डोकावेल
सुप्त भावनांना होऊन घाई
अधिर अश्रूंचा बांध फुटेल

पारवा

चालताना अलगद तुझा हात हाती यावा
अन मग मनाचा पारवा धुंद होऊन जावा
न कळे कुठे होईल या प्रवासाचा शेवट
तुझा हात मात्र अंतापर्यंत न सुटावा

Sunday, May 16, 2021

मोती

प्रत्येकाच्या नशिबाचं आधीच ठरलेलं असतं
कोणाचं फळतं कोणाचं अगदीच फसतं
सागरातल्या अगणित थेंबांसम आपण सारे
प्रत्येकाच्या नशिबी मोती होण्याचे भाग्य नसतं

Saturday, May 8, 2021

थेंब

तुझ्या आठवणसरी बरसून गेल्या
केवळ एकच अनवट स्मृतीथेंब उरला
चातकासम तृषार्त माझ्या मनाला
तो एक थेंबच तृप्त करून गेला

Thursday, May 6, 2021

अंतरंग

माझ्या अंतरंगात बघाल तर
खूप गडबड गोंधळ दिसेल
स्वतःच्या आत पाहिलंत तरी
वेगळे काहीच दिसणार नाही






Monday, May 3, 2021

नातं

नात्यांमध्ये व्यवहार कधी जमला नाही
त्यामुळेच असेल कदाचित
जी काही टिकलेली नाती आहेत
त्यांत मी समाधानी आहे हे निश्चित

स्पर्श

प्रेमात स्पर्शाला फार महत्त्व असते!!!
ज्याची मर्यादा स्वत:च ठरवावी लागते!!!
तो जर मर्यादित असेल तरच प्रेम खुलते!!!
पातळी ओलांडली तर प्रलयाची खात्री असते!!!

Sunday, May 2, 2021

दृष्टी

सकाळी उठलो तर तिच सकाळ तेच रूटीन
आजूबाजूची माणसं ही तीच, तीच सृष्टी
मनाची कवाडे सताड उघडली तेंव्हा जाणवले
प्रत्येक दिवसाचे वेगळेपण दिसते ती खरी दृष्टी

वळण

ओळखीच्या रस्त्यावर चालत होतो.
अचानक एका वळणावर पाय थबकले
मन काहीसे मागे गेले आणि जाणवले
याच वळणाने मला या रस्त्यापासून दूर केले

पावती

एखाद्या घटनेने वाईट वाटते
टचकन डोळ्यात पाणी येते
मन मुर्दाड झालेले नाही
त्याचीच ती पावती वाटते

स्मशान

स्मशानभूमी पण आजकाल मला वेगळीच भासते 

भूतकाळात गेलेली व्यक्ती वर्तमानाच्या सरणावर जळत असते

तिथे जमलेली गर्दी भविष्याची चर्चा करताना दिसते

तिमिर

अंधारातून चालत होतो प्रकाशाच्या आशेने 
खुप अंतर चालल्यावर लक्षात आले 
आपल्याला फसवले या तिमिराने 
आता हे माझ्यासोबत काय होत आहे
 हा तिमिरच मला उजेडासम भासत आहे

शांतता

शांत ठिकाणी जाऊन बसलो वाटलं
 आता कोण सतावणार
 मनच थाऱ्यावर नाही
 त्याला ही शांतता तरी काय करणार

भास

भास हा केवळ भास असतो 
खर्याचा तो केवळ आभास असतो
 मन तर एवढं सुन्न, कळत नाही आहे
 मनातले विचार आहेत की तो ही भास आहे