Monday, March 28, 2022

निर्माल्य

झाडावरून ओघळणार्या फुलाचे ते प्रारब्ध असते
जमिनीला स्पर्श होताच त्याचे निर्माल्य होते

Wednesday, March 9, 2022

फुंकर

आजकाल चंद्रापाशी
माझं मन मोकळं करतो
तोही माझ्या मनावर मग
चांदण्याची फुंकर घालतो

परवानगी

तुझ्या आठवणींची साथ
काही केल्या सुटत नव्हती
खरं तर त्यांना जायचे होते
पण माझी परवानगी नव्हती

बेचिराख

स्वतः जळून,तुला उजळताना पाहिले
होऊन बेचिराख मी,स्वतःला विझताना पाहिले 

आवाज

झाडावरून खाली पडताना
फुलाचा आवाज न व्हावा
आयुष्याचा अंतिम क्षण
अगदी तसाच असावा

अंगार

मोडून पडलो आहे
पण संपलेलो नाही
जरी राख झालो आहे
तरी अंगार विझलेला नाही

आकार

माझ्या वेदनेला
मी हुंकार दिला
शब्दांच्या साथीने
कवितेला आकार दिला

स्वागत

दिनकर गेला अस्ताला
आपले तेज आवरून
चंद्राने केले स्वागत माझे
आपले चांदणे पसरून

झिरपणे



वाचलेले काही आजकल लक्षात राहत नाही
शब्द शिरती मनात, पण त्यांचे झिरपणे मात्र होत नाही

ओढ

धुक्यात हरवली वाट
पुढचे काहीच दिसेना
पावलांना ओढ वाटेची
परतीची आस वाटेना

गाज

वाटे या समुद्राला
सांगावे मनाचे गूज
देऊन हुंकार गाज
करेल तो हितगुज

एकटा

कोणी नव्हते सोबतीला
माझा मी एकटा बरा होतो
आता उगा तुझ्या आठवणींनी
स्वतःला त्रास करून घेतो

सुगंध

माझ्या सुगंधाचे मीच काय कौतुक करावे
उरात भरून घेऊन ज्याने त्याने अनुभवावे

माती

ती नात्यांची भग्न शिल्पे
माझ्यासाठी अमूल्य होती
जी घडविताना मी वापरली
माझ्या आयुष्याची माती

घाव

घडली सुबक मूर्ती
अन् देवपण लाभले
या एकाच कारणासाठी
त्या अनाम पत्थराने
अगणित घाव सोसले

आस

उभा एकटा या तमात
मनात प्रकाशाची आस
जाळून हा अंधार सारा
उजळेन तो मी खास

पांघरूण

डबडबत्या डोळ्यांना पापण्यांनी झाकून टाकले
माझ्या दुःखांवर मी अलगद पांघरूण घातले