Monday, June 7, 2021

प्रतिबिंब

फार दिवसांनी निरभ्र आकाश दिसले
आसमंती जमला चांदण्यांचा मेळा
पाण्यात पडलेले त्यांचे प्रतिबिंब
पहाण्यासाठी झाले सगळे गोळा 

Friday, June 4, 2021

भेट

आपली जेंव्हा केंव्हा भेट होते
न कळे मी असा का वागतो
तुझे लक्ष दुसरीकडे गुंतवून
तुझ्याचकडे पहात असतो

भूल

मी आपल्या रस्त्याने चालत होतो
वळणाला भुललो नाही कधीच
तरी एका वळणाने भूल घातली
ज्या वळणावर तू उभी होतीस

क्षण

माझ्या आयुष्याच्या अंतिम क्षणी
मला खूप वाईट मात्र नक्की वाटेल
कमावलेले सोबत नेता येणार नाही
गमावलेले मात्र सतत आठवेल

पिंजरा

खिडकीतल्या पिंजर्‍यातले पक्षी
आज मी त्यांना मोकळे केले
म्हटलं आपण अडकलोय निर्बंधांत
निदान त्यांना करू आकाश खुले

पुस्तक

अभ्यासाचे नवीन पुस्तक जेव्हा हाती यायचे
त्याचा कोरा वास अजून स्मरणात आहे
पुस्तकातल्या मजकुराशी जमले नाही कधी
त्या वासाशी मात्र नाते अजून टिकून आहे

आर्जव

शब्दांना जे जमले नाही
ते अबोल स्पर्शाने केले
माझ्या मनाचे आर्जव
तुझ्यापर्यंत पोहोचवले

काच

आठवणींची काच लागून
हळवं मन जखमी झाले
घाव कीती खोल होता
हे अनंत अश्रूंनी सांगितले

पाझर

समोरच्या घरातला एकटा म्हातारा जीव
कायम घरातल्या भिंतींशी बोलताना पाहिला
परवाच त्या एकटेपणातून तो कायमचा सुटला
दुःखाने त्या दगडी भिंतींना पाझर फुटलेला दिसला