Wednesday, March 9, 2022

गाज

वाटे या समुद्राला
सांगावे मनाचे गूज
देऊन हुंकार गाज
करेल तो हितगुज

एकटा

कोणी नव्हते सोबतीला
माझा मी एकटा बरा होतो
आता उगा तुझ्या आठवणींनी
स्वतःला त्रास करून घेतो

सुगंध

माझ्या सुगंधाचे मीच काय कौतुक करावे
उरात भरून घेऊन ज्याने त्याने अनुभवावे

माती

ती नात्यांची भग्न शिल्पे
माझ्यासाठी अमूल्य होती
जी घडविताना मी वापरली
माझ्या आयुष्याची माती

घाव

घडली सुबक मूर्ती
अन् देवपण लाभले
या एकाच कारणासाठी
त्या अनाम पत्थराने
अगणित घाव सोसले

आस

उभा एकटा या तमात
मनात प्रकाशाची आस
जाळून हा अंधार सारा
उजळेन तो मी खास

पांघरूण

डबडबत्या डोळ्यांना पापण्यांनी झाकून टाकले
माझ्या दुःखांवर मी अलगद पांघरूण घातले